Saturday, February 2, 2008

कसे असावे बाथरूम?

वास्तूशास्त्रात स्नानगृहाला म्हणजेच बाथरूमलाही मोठे महत्त्व आहे. शहरांमध्ये जागेअभावी मोठी बाथरूम्स बांधणे शक्य नसते, पण आकारापेक्षा बाथरूमच्या वास्तुशास्त्रीय रचना अधिक महत्त्वाची ठरते.

बाथरूमसाठी सर्वात योग्य स्थळ म्हणजे वास्तुची पूर्व दिशा, पूर्वेला बाथरूम म्हणजे चांगल्या आरोग्याची जणू पोचपावतीच ! कारण प्रभातकाळी स्नान करताना किंवा केल्यावर सूर्य प्रकाशाची सर्व सौम्य व उपयुक्त किरणे अंगावर पडणे म्हणजे जणू शरीराची व मनाची 'बॅटरी चार्जिंग करणे ! ज्या वास्तुमध्ये पूर्वेला बाथरूम असते ते लोक सदा उत्साही, निरोगी, आनंदी व प्रसन्न असतात. दीर्घायुषी होतात.

पूर्वेच्या बाथरूमची निर्मिती करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
बाथरुममधील फरश्यांचा (फ्लोअरींगचा) उतार हा नेहमी ईशान्येस किंवा पूर्वेस असावा.

बाथरुममधील सांडपाणी वाहून नेणारा ड्रेनेजचा पाईप बाथरुमच्या ईशान्य कोप-यातून खालून काढावा म्हणजे बाथरुमचे 'आऊटलेट' ईशान्य कोप-यात किंवा पूर्वेला असावे.

स्नानगृहातील गिझर, वॉटर हिटर, पाणी तापविण्याचा बंब, स्वीच बोर्ड या किंवा यासारख्या अग्निशी किंवा विजेशी संबंधित असलेल्या गोष्टींची रचना स्नानगृहातील आग्नेय कोप-यात करावी. पाण्याच्या नळाची तोटी - शॉवर हा पूर्वेस किंवा उत्तरेस असावा. त्यामुळे आंघोळ करताना आपले तोंड पूर्वेस किंवा उत्तरेस होईल.

बाथरुममधील पाण्याचे भरलेला ड्रम, बॅरेल किंवा हौद हा बाथरुमच्या नेऋत्य कोप-यात असावा. (या ठिकाणी 'जडत्व' महत्वाचे ठरते!) स्नानगृहातील शांपू, साबण (आंघोळीचा, कपडे धुण्याचा, भांडी घासण्याचा), वॉशिंग पावडर, मोरी घासण्याचा ब्रश, खराटा, फिनेल किंवा टाईल्स धुण्यासाठी वापरण्यात येणारे लिक्वीड क्लिनर, धुण्याचे कपडे या गोष्टी स्नानगृहातील वायव्य कोप-यात ठेवाव्यात.

बाथरुमच्या पूर्वेला एखादी खिडकी किंवा मोठे व्हेंटिलेटर ठेवणे फार महत्वाचे आहे. बाथरुमध्ये स्नानासठी जर 'टब' बसवायचा असेल तर तो बाथरुमच्या नैऋत्य कोप-यात दक्षिणोत्तर किंवा पूर्व पश्चिम होईल अशा पध्दतीने बसवावा आणि आंघोळ करताना आपले डोके दक्षिणेस किंवा पश्चिमेस होईल, अशा पध्दतीनेच त्याची रचना करावी.

पूर्वेच्या बाथरुमच्या वर (म्हणजे बाथरुमवरच्या माळयावर) कोणत्याही जड किंवा अडगळीच्या वस्तु अजिबात ठेऊ नयेत. बाथरुममधील आरसे पूर्वेस किंवा उत्तरेस असावेत.

ईशान्य, आग्नेय, नेऋत्य व उत्तर या भागांमध्ये कधीही बाथरुम बांधू नये अन्यथा वास्तु दोष निर्माण होतात. बाथरूममध्ये शक्यतो सिलिंगपर्यंत टाईल्स लावून घ्याव्यात म्हणजे शॉवरखाली किंवा उभे राहून आंघोळ करताना आपल्या अंगावरचे साबणाचे पाणी चारही भिंतीवर जरी उडाले तरी त्या भिंती घाण होणार नाहीत. त्या भिंतीवर डाग पडणार नाहीत. कारण टाईल्सच्या भिंती साफ करणे व धुणे सेपे व सोईस्कर जाते. त्यामुळे स्नानगृह 'अधिक स्वच्छ' दिसण्यास मदत तर होईलच पण स्नान करताना देखील 'अधिक प्रसन्नता' वाटेल.

वॉश बेसीन पूर्वेच्या किंवा उदारेच्या भिंतीवर बसवावे म्हणजे तोंड धुताना आपले तोंड पूर्वेस किंवा उत्तरेस होईल.पश्चिम, दक्षिण किंवा वायव्येच्या बाथरूममुळे सुध्दा चांगले आरोग्य, सौख्य, दीर्घायुष्य व आनंद प्राप्त होतो. स्नानगृहाची बांधणी करताना थोडी काळजी घेतली तर त्याचा फायदा आपल्यालाच होतो. म्हणूनच बाथरूम बांधताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे.

-------------------------------------------------------------------------------------------

Prasad Kelkar --VastuShastra Consultant

Contact No : 7720033528

No comments: